मुंबई- कोरोना संक्रमण पाहता सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आलेली लोकल रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राज्य सरकारकडून या आधीच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. 13 जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडून लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करून निर्णय घेण्यात येईल, असं मुंबई उच्च न्यायालयात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितल्यानंतर बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यान लोकल सर्वांसाठी खुली करण्यास आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
राज्य सरकारकडून लोकल सुरू करण्याची कुठलीही माहिती रेल्वेला नाही-
राज्य शासनाकडून रेल्वे विभागाला कुठल्याही प्रकारचे माहिती या संदर्भात देण्यात आलं असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता पुण्यादेश, गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा च्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दरम्यान राज्यात अनलॉक च्या दिशेने काम केले जात असताना बर्यापैकी गोष्टी सामान्य जनतेसाठी खुल्या करण्यात आल्यानंतर लोकल रेल्वे कधीपर्यंत सुरू करण्यात येईल अशी विचारणा करण्यात आली होती.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की..
शहर आणि परिसरात सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय आज पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यासाठी सरकारची तयारी असली तरी न्यायालयात मात्र सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला नाही, असा खुलासा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देत हा विषय पुढील आठवड्यात मार्गी लागेल, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. वडेट्टीवार म्हणाले की, उपनगरीय रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा आदी आम्ही सर्व तयारी दर्शवली आहे. मात्र, आज न्यायालयात आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही, यामुळे यासाठीचा निर्णय होऊ शकला नाही. पुढील सुनावणीदरम्यान सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा निर्णय मार्गी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
बाहेरगावच्या प्रवाशांना मिळाली प्रवासाची परवानगी
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायचा असल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस ही स्थानके प्रामुख्याने गाठावी लागतात. मात्र, सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा नसल्याने बाहेरगावी जाण्यासाठी घरून निघणाऱ्या व बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड कोंडी होत होती. लोकलचा पर्याय उपलब्ध नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसून प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे १५ डिसेंबर रोजी केली होती. ही मागणी रेल्वेकडून मान्य करण्यात आली आहे.
कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीने प्रवास करायचा असेल त्यावेळी कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन केले आहे. त्याचवेळी लोकलमध्येही या नियमांचे पालन करण्यात यावे. लांब पल्ल्याच्या गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला लोकल रेल्वेचे तिकीट काढावे लागणार आहे, हे तिकीट सहा तास अधिकृत असणार आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सुरु करण्याचे दिले होते संकेत
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असून लवकरच मुंबई मध्ये सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करता येऊ शकते का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी डिसेंबर महिन्यात दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी घेतला होता आढावा
मुंबईमध्ये सातत्याने लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. पण कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकल सेवा अंशतः सुरू करण्यात आली आहे. मात्र आता परिस्तिथीत सुधारणा होत आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री लोकलबाबतचा आढावा घेत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री ठाकरे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. तसेच रेल्वे प्रवासासाठी काही वेगळे नियम लावता येतील का, याचीही चाचपणी करून निर्णय घेतला जाईल, असेही वड्डेटीवार यांनी सांगितले होते.