मुंबई - मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असून लवकरच मुंबई मध्ये सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू करता येऊ शकते का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री घेत आहेत आढावा
मुंबईमध्ये सातत्याने लोकल सुरू करण्याची मागणी होत आहे. पण कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकल सेवा अंशतः सुरू करण्यात आली आहे. मात्र आता परिस्तिथीत सुधारणा होत आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री लोकलबाबतचा आढावा घेत आहेत. पुढच्या काही दिवसात मुख्यमंत्री ठाकरे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. तसेच रेल्वे प्रवासासाठी काही वेगळे नियम लावता येतील का, याचीही चाचपणी करून निर्णय घेतला जाईल, असेही वड्डेटीवार यांनी सांगितले.