मुंबई - 'बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे...पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षानी एकदाच हर्ष...' प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले हे अजरामर गाणं. गणेशोत्सवाची ओढ म्हणजे नेमके काय असते, हे गीत ऐकताना लक्षात येते. मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसालाही नेमकी अशीच ओढ गणेशोत्सव जवळ आला की लागलेली असते. गावाकडे कधी जातोय, असे त्यांना झालेले असते. इतके भावनिक नाते या सणाचे कोकणी माणसाशी आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा चाकरमानी गावी जाऊ शकत नसल्याने एका शिवसैनिकाने मालवणी भाषेतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली आहे.
कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळेच समीकरण आहे. दरवर्षी लाखोच्या संख्यने चाकरमानी या सणाला गावी जात असतात. या दिवसांची चाकरमानी आतुरने वर्षभर वाट पाहत असतो. घराघरात बसणारा गणपती, भजन मंडळ एक वेगळाच उत्साह या दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात दिसून येते. यंदा कोरोनाचे सावट या सणावर आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. या अडचणी मार्ग काढा, असे मालवणी भाषेतील पत्र शिवसैनिक समीर राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले असून सध्या या पत्राची जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा - मुंबईच्या आस्माची हजारो ख्वाहिशे ऐसी...फुटपाथवर राहून दहावीत मिळवले यश
सध्या कोकणात जाण्यासाठी प्रवासी गाड्या मनमानी भाडी आकारात आहेत. दरवर्षी या दिवसात तुडुंब भरत असलेली कोकण रेल्वे बंद असल्याने यंदा जर गावी जायचे असेल तर रस्ते वाहतुकी शिवाय पर्याय नाही. ई-पास मिळत नाही. दुसरीकडे क्वारंटाईन होण्यास दिलेला कालावधीमुळे नेमके गावी कधी जायचा, हा प्रश्न चाकरमान्यांना सतावत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने देखील वेगवेगळे नियम लावले आहेत. या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर व्हावा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी भूमिका घ्यावी, यासाठी राणे यांनी हे पत्र लिहले आहे.
राणे या पत्रात म्हणतात की,
"आज आपणास पत्र लिहूचा कारण असा की, आज आम्ही कोकणी माणसाक वाली हा की नाय माहीत नसा. आजपर्यंत कोकणी माणसाक काय मिळाला आणि काय नाय मिळाला या आमचा आमकाच माहित हा. आज कोकण रेल्वे सुरु हा पण कोणासाठी परप्रांतीयांसाठी असा, आमका वाटता आज तुमच्या मार्गदर्शनाची आमका गरज असा. या कोरोनामुळे माणसा दुरावली हो. आमची कोकणी माणूस आजपर्यंत कोणाक घाबरलो नव्हतो. पण आमका आज पण आमचा गावाची ओढ हा. आज जरी आम्ही मुंबईत रव्हत असलाव तरी पण आमका शिमगो आणि चतुर्थी हवीहवीशी वाटता हो. आमची चेष्टा करतत आणि लोका वर आमका म्हणतत की, कोकणी माणूस शिमग्याक आणि चतुर्थीक नोकरी सोडान जाता पण तसा नाय हो, आजपर्यंत आज आमचा पूर्वजांनी केलेली प्रथाच आम्ही जपताव म्हणूनच साहेबांनू आपणांस विनंती करतय."