मुंबई - भाजपाचे नेते किरीट सोमैया हे आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. एकामागून एक नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यासाठी ईडी तसेच सीबीआय कार्यालय गाठत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराबाबतची कागदपत्रे आपल्याकडे असल्याच्या आशयाचे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांना लिहिल आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांना पत्र लिहून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवावा, असे या पत्रातून संजय राऊत यांनी म्हटले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.
पत्रात काय म्हणाले संजय राऊत -
2018-19 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी शंभर कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यात आले. हे टेंडर काढत असताना काही खास कंपन्यांचे हित लक्षात घेऊन अटी व शर्ती ठेवण्यात आल्या असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रातून केला आहे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्कस. या दोन्ही कंपन्यांना 500 कोटी पर्यंतची कामे देण्यात आली असल्याचे या पत्रातून संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच याबाबतचे काही कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
पत्र लिहून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न? -
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमैया हे आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना नेते अनिल परब, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी किरीट सोमैया यांना पत्र लिहून एकप्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - अखेर ठरले : चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार