मुंबई - राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत 8 ते 12 वी शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या सूचनांनुसार घेतला जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण केले जाईल असही महापौरांनी यावेळी सांगितले आहे. यावरून मुंबईमधील शाळा सुरू करण्यापूर्वी पालिकेचा सावध पावित्रा घेतल्याचे दिसत आहे.
टास्क फोर्सच्या सूचनांप्रमाणे निर्णय -
गणेशोत्सवानंतर कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली नसल्याने, कालच राज्यातील शाळा येत्या 5 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईचा सध्या पॉजिटीव्हीटी रेट सध्या 0.06 टक्के आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत पॉझिटिव्हीटी रेटवर पालिका प्रशासन लक्ष ठेवणार आहे. टास्क फोर्सच्या सूचनांप्रमाणे शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असही महापौर म्हणाल्या आहेत.
शिक्षकांचे लसीकरण -
मुंबईत तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होईल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्य चांगले राहिले पाहिजे, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल. त्यासाठी शिक्षकांच्या लसीकरणावर भर देणार आहे. आतापर्यंत 10 हजार पैकी 7 हजार म्हणजेच 70 टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
बेड रिक्त -
मुंबईत कोरोनाचा सध्या पॉझिटीव्हिटी रेट ०.०६ टक्के आहे. १०० पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, १५ टक्के बेडवरच रुग्ण आहेत. ८५ टक्के बेड रिक्त आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्यांचा रिझल्ट काय येत आहे, याचा आढावा घेतला जात आहे अशी माहिती महापौरांनी दिली. गणेशोत्सव संपल्यावर मुंबईत येणाऱ्या नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास त्वरित कोरोना चाचण्या करून घ्याव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.