मुंबई - मुंबईतही लसीचा तुटवडा असल्याने बीकेसी, भाईंदर, मुलुंड येथील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे, अशी खंत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी व्यक्त केली. तसेच देशातील एकूण रुग्ण संख्येपैकी 62 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असताना देखील केंद्राकडून महाराष्ट्राला लसीचा साठा हा इतर राज्यांपेक्षा कमी मिळतोय, असा आरोपही अस्लम शेख यांनी केंद्र सरकारवर केला आहे. गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील रुग्ण संख्येपेक्षा निम्मी रुग्णसंख्या असताना देखील या राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लसी पाठवल्या जात आहेत. हे महाराष्ट्रासोबत केलेला अन्याय असून या अन्यायाविरोधात महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी केंद्र सरकारशी संवाद साधायला पाहिजे, असा टोला अस्लम शेख यांनी भाजपला लगावला आहे.
सध्या राज्याकडे लसींचा साठा कमी असून देखील भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र सरकारवर आरोप केले जात आहेत. ही महाराष्ट्राची बदनामी असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
तसेच राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारने ज्या गाईडलाईन्स जनतेसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी आखून दिल्या आहेत, त्या गाईडलाईन्स तंतोतंत पाळाव्यात, अशी विनंती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. तसेच भाजप नेत्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, मोर्चे तसेच आंदोलन करण्याची ही वेळ नाही. राज्याच्या जनतेसाठी जर भाजप नेत्यांना काही करायचे असेल तर, केंद्रातील भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्राला लस मिळवून द्यावी, असा टोमणा अस्लम शेख यांनी लगावला.