मुंबई - कृषी योजनांसाठी राज्यात प्रथमच महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने सोडत काढण्यात आली. राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे यावेळी निवड केली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार असल्याची माहिती, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
महाडीबीटी प्रणाली विकसीत-
शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध विविध योजनांचा लाभ दिला जातो. यापूर्वी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज करावा लागत असे. प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसीत केली आहे. शेतकऱ्यांना आपल्या गावातुनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून आवश्यक कागदपत्रे एकाचवेळी जोडता येणार आहेत. तसेच आर्थिक वर्षात लाभ न मिळाल्यास मागील वर्षाचा अर्ज पुढील वर्षीही ग्राह्य धरला जाणार आहे, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
११ लाख ३४ हजार नोंदणीधारक-
नव्याने विकसित केलेल्या या प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी केली आहे. तसेच विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली. प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नविन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
सतत अर्जांचे टेन्शन मिटणार
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करावे. येथे निवडीबाबतची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होईल. जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांची निवड रद्द करुन संगणकीयप्रणालीद्वारे प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल. ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार असल्याने सातत्याने अर्ज करावे लागणार नाहीत, असे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.
हेही वाचा- 'आजचे साधू नालायक आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका' विजय वडेट्टीवार यांचे वादग्रस्त वक्तव्य