मुंबई - संजय राऊत प्रभुरामाच्या भूमीबद्दल बोलत असताना आपल्या पांडुरंगाच्या भूमीत काय चालले आहे, या विषयी त्यांना भाष्य करायला वेळ नाही. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पवित्र भूमीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना ग्रामीण भागातही परिस्थिति बिकट असल्याची दिसून येत आहे. परंतु संजय राऊत पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, संपूर्ण देशाची, देशपातळीवरील नेत्यांची काळजी त्यांना जास्त आहे. ते सध्या देश पातळीवरचे नेते होत असल्याकारणांमुळे त्यांना देशाची चिंता जास्त असल्याचे त्यांच्या व्यक्तव्यातून दिसून येत आहे, अशी टीका विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेटिंलेटर संदर्भातही भाष्य केले.
सोयीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल-
दरेकर म्हणाले, संजय राऊत सध्या निवडणूक आयोगाचा, न्यायालयाचा निर्णय आपल्या परीने, आपल्या बाजूने लागला नाही तर त्यांच्यावर सुद्धा शंका निर्माण करत टीका करण्याचे काम करताना दिसून येत आहेत. भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात निवडूक आयोगातून अथवा सर्वोच्च न्यायालयातून एखादा निर्णय झाला, तर महाविकास आघाडीकडून आयोगाचे किंवा न्यायालयाचे कौतुक केले जाते. त्याच प्रमाणे संजय राऊत हे आपल्या सोयीच्या भूमिका सातत्याने घेत असतात. आपल्या सोयीचे असेल तर चांगले आणि आपल्या सोईचे नसेल तर ते वाईट, या भूमिकेतून अशा प्रकारची वक्तव्ये संजय राऊत करत असून ते जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही दरकेर यांनी केली.
महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार अहंकारात चालले आहे, म्हणून केंद्राशी समन्वय साधायला नको. संकटाच्या काळात कोरोनाविषयी, मराठा समाजाविषयी केंद्राशी समन्वय साधन्यात महाविकास आघाडी सरकारला कमीपणा वाटतो, हे सर्व अहंकारापोटी वागत असून स्वतः अहंकारने भरले असल्यामुळेच यांना जग अहंकारी दिसत असल्याची बोचरी टीकाही दरेकर यांनी महा विकास आघाडीवर केली.
पीएम केअर मधून मिळालेले व्हेंटिलेटर अजून पण धूळखात -दरेकर
वर्षभरातील कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मुंबई काय, गाव काय सर्व ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशावेळी राज्यात वैद्यकीय औषधांचा तुडवडा भासत असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. संकट काळात मदत म्हणून पीएम केअर फंडातून मधून देण्यात आलेले ४०० व्हेंटिलेटर सध्या वापरात नसून ते धूळ खात पडले आहेत असल्याचा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला आहे.
कोरोना काळात राज्यात परिस्थिती गंभीर असताना वैद्यकीय औषधांचा तुडवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे. केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले ४०० व्हेंटिलेटर न वापरणे, हे राज्याला या गंभीर परिस्थितीमध्ये शोभा देणारे नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
काही अंशी खराब असतील व्हेंटिलेटर-
व्हेंटिलेटर खराब असल्याकारणामुळे वापरत नसल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले असल्याच्या प्रकरणी बोलताना दरेकर म्हणाले, काही अंशी ते खराबही असू शकतील. पण त्याकरिता ४०० व्हेंटिलेटर न वापरणे यात काय अर्थ आहे. फक्त पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर आले म्हणून वापरले जात नाहीत का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली. तसेच अशा पद्धतीचे घृणास्पद राजकारण महाविकास आघाडी सरकारने करू नये, अशी विनंती दरेकर यांनी केली आहे.