मुंबई - राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रदुर्भावासोबतच राजकीय प्रादुर्भाव देखील तीव्र होत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीला महामारीच्या मुद्द्यावर घेरायला सुरुवात केली असून महाराष्ट्र बचाओ आंदोलनाची हाक दिली. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधीपक्ष आग्रही आहे. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुपारी चार वाजता फडणवीस यांच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
फडणवीस यांच्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. आता राणे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या दरम्यान राणेंची मागणी ही भाजपची अधिकृत मागणी आहे का? याबाबत ही फडणवीस भाष्य करण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातले राजकारण देखील ढवळून निघत आहे. महामारीच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाचे नेते वारंवार राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत आहेत.
महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी खालावत असून लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, या आशयाचे ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. त्यामुळे राज्यातले राजकारण वेगळ्या दिशेला जात असल्याचे चित्र आणखी स्पष्ट झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चांना सुरुवात झाली.
मात्र कोणताही धोका नसून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच ज्यांना कोणाला राजकारण करायचे आहे, त्यांनी ते खुशाल करावं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राऊत यांच्यात 'मातोश्री'वर बैठक झाली. मात्र, आता यासंदर्भात विरोधीपक्ष नेते फडणवीस काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.