मुंबई - सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका होऊ लागली. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने बोध घ्यावा, असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने बोध घ्यावा
मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे काही मराठा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली. आज देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आम्ही दिलेलं आरक्षण या सरकारला न्यायालयात टिकवता आलं नसल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच केंद्र सरकारचा याविषयाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी तामिळनाडूतील आरक्षणाचा संदर्भ दिला.
तुम्ही दाऊदच्या घरावर कारवाई केली नाही आणि कंगनाचं घर तोडता!
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई मनपा आणि संजय राऊत यांच्याविरोधात अभिनेत्री कंगना रणौतने मोहीम उघडल्याचे चित्र आहे. कंगनाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात भाष्य केल्यानंतर तिच्या मुंबईतील पाली हिलस्थित घरावर कारवाई करण्यात आली. हे घर अनधिकृत असल्याचे मनपाने सांगितले. या विषयावर, 'तुम्ही दाऊदच्या घरावर कारवाई केली नाही; आणि कंगनाचं घर तोडता, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
'घरची धुणी रस्त्यावर धूत नाही', खडसे- फडणवीस वादावरही भाष्य
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केले. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरील नाराजी पुन्हा व्यक्त केली. या भाजपाच्या अंतर्गत कलहासंदर्भात बोलताना, 'घरची धुणी रस्त्यावर धूत नाही,' असे फडणवीसांनी म्हटले. खडसेंचा राजीनामा मी मागितला नसून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे त्यांनी सांगितले. खडसेंना माझ्याबाबत काही गैरसमज असल्यास त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी फडणवीसांनी दर्शवली. सध्या आम्ही दाखल केले अहवालावर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे फडणवीसांनी म्हटले.