मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने धारावी परिसरात मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र उभारण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. तब्बल १११ शौचकुपांसह आंघोळीची व कपडे धुण्याची देखील अत्याधुनिक व यांत्रिक सुविधा असणाऱ्या या सुविधा केंद्राचे भूमिपूजन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज झाले.
या आधुनिक सुविधा केंद्राची उभारणी 'हिंदुस्तान युनिलिव्हर' या कंपनीच्या 'सामाजिक उत्तरदायित्व निधी'मधून करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच 'युनायटेड वे मुंबई' या संस्थेचेही सहकार्य या सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी प्राप्त झाले आहे. पुढील सहा महिन्यात धारावीकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे 5 हजार व्यक्तींना लाभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
धारावीत सर्वाधिक मोठे सुविधा केंद्र-
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धारावी परिसरात मुंबईतील सर्वात मोठे सुविधा उभारण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र ठरणार आहे. या सुविधा केंद्रात १११ शौचकूप, ८ स्नानगृह आणि कपडे धुण्यासाठी १० मोठ्या आकाराची यंत्रे असणार आहेत. 2016 मध्ये घाटकोपर मधील आज़ाद नगर परिसरात पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले होते. आता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे.
सुविधा केंद्राचे वैशिष्ट्य-
धारावी परिसरात सुविधा केंद्र सुमारे 2 हजार 600 चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या (जी + 2) या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणार आहेत. तसेच हे सुविधा केंद्र गंध मुक्त असेल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.या सुविधा केंद्रातील स्नानगृहाचा लाभ घेणाऱ्यांना साबणाची वडीही दिली जाणार असून आंघोळ करताना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्राच्या वर वैशिष्ट्यपूर्ण सोलर पॅनल बसविले जाणार आहेत.
असे असणार शुल्क-
या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले जाणार असून परिसरातील नागरिकांना केवळ १५० रुपयात कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील ५ व्यक्तींना निर्धारित सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी लहान मुलांना मोफत प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधा (Laundry Facility) देखील या सुविधा केंद्रात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही वाचा - मालेगावच्या माजी आमदारावर गुन्हा; नियमांना तिलांजली देत घेतली होती जाहीर सभा
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सपत्नीक घेतली कोरोनाची लस
हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार