मुंबई - साकीनाका येथील असल्फा गावामधील वाल्मिकी नगर या डोंगराचा पायथ्याशी वसलेल्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना आज घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेत 5 ते 6 घरांचे नुकसान झाले.
वाल्मिकी नगरमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात डोंगराखाली वस्ती वाढली आहे. यात अनेक घरे डोंगर पोखरून बनवण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणच्या वस्तीवर असलेला डोंगर धोकादायक झाला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आज सकाळी डोंगराचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने ज्या घरांवर ही दरड कोसळली ती घरे पालिकेने पावसाळ्यापूर्वीच रिकामी केली होती. यामुळे जीवितहानी टळली.