मुंबई - मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) मार्गाच्या कारशेडवरून मोठा वाद सुरू असून हा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. तर आता मात्र हा एक मोठा जमीन घोटाळा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कांजूरमार्ग येथील 500 एकर जमीन 521 कोटी रुपयांमध्ये 2009 लाच विकण्यात आली आहे. यासंबंधीची सर्व कागदपत्रे आपल्या हाताला लागली असून आता या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
गरुडीयाचा जमिनीवर दावा
मेट्रो 3 कारशेडसाठी कांजूरचा पर्याय सुचवण्यात आला होता. पण ही जमीन न्यायप्रविष्ट आहे, ही जमीन खासगी बिल्डरच्या मालकीची आहे असे अनेक दावे करत फडणवीस सरकारने हा पर्याय नाकारला. पण शेवटी महाविकास आघाडी सरकारने मेट्रो 3चे कारशेड आरेतून कांजूरला हलवले. त्यानंतर मात्र या जागेवरून नवीन आणि वेगळेच वाद सुरू झाले. ही जागा आपली असल्याचा दावा केंद्र सरकारच्या मिठागर विभागाने केला. तर त्यानंतर गरुडीया बिल्डरही समोर आला आणि त्यानेही ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला. मुळात ही जमीन मिठागराची असून त्याचा भाडेकरार संपलाच आहे. भाडे करार संपल्यानंतर ही जागा आपोआप राज्य सरकारच्या ताब्यात येते. असे असतानाही या जागेवर गरुडीया बिल्डरकडून मालकी हक्क दाखवला जात असून यासाठी गरुडीयानेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
521 पैकी 471 कोटी अदा
मिठागराच्या जमिनीचा दावा संपल्यानंतर त्यावर केवळ राज्य सरकारचा हक्क असतो. तेव्हा 2016मध्ये भाडे करार संपला असून आता ही जमीन राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. पण आता कांजूर येथील कारशेडच्या 102 एकर सह 500 एकर जागा गरुडीयाने 2009मध्ये विकून टाकली असल्याची माहिती समोर आली आहे. ही जागा गरुडीया विकुच कसा शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यामुळेच की काय 2015पासून तत्कालीन सरकारकडून कांजूरच्या पर्यायाकडे कानाडोळा केला जात होता, असा सवाल बाथेना यांनी केला आहे. दरम्यान, ही जागा 521कोटीत शापुरजी पालनजीला विकण्यात आली आहे. तर या 521कोटी पैकी 471कोटी शापुरजी पालनजी यांनी गरुडीयाला अदा ही केले आहेत. आयकर विभागाच्या कागदपत्रातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
याच जमिनीवर बांधायची होती 1 लाख घरे
ही जागा शापुरजी पालनजीला विकली आणि ही बाब गरुडीयाने लपवली. पण आता मात्र एक एक बाबी समोर येत असल्याचे बाथेना यांनी सांगितले आहे. दरम्यान, याच जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख परवडणारी घरे बांधण्याचा प्रस्ताव शापुरजी पालनजीने ठेवला. तर या प्रस्तावाची दखल घेत तत्कालीन फडणवीस सरकारने 11जून 2019मध्ये ही घरे बांधण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यासाठी अध्यादेश जारी केला. मात्र पुढे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि हा प्रस्ताव रखडला.
लवकरच न्यायालयात धाव
राजकीय विरोधामुळे कांजूरला विरोध होत असल्याचे म्हटले जात असतानाच आता हा मोठा जमीन घोटाळा असल्याचा आरोप बाथेना यांनी केला आहे. दरम्यान 2018मध्ये फडणवीस सरकारने मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी)कारशेडसाठी कांजूरची जागा दिली होती. मेट्रो 6साठी केवळ 15 हेक्टर जागा लागणार असल्याने याला विरोध झाला नसावा. पण पुढे मेट्रो 3, मेट्रो 4 चेही कारशेड येथे आले तर मेट्रो 14ची सुरुवात येथूनच करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने घेतला. या सर्व कामासाठी 40 हेक्टरहुन अधिक जागा लागणार म्हणताच यावरून आता वाद सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर ही जागा बेकायदेशीररित्या विकण्यात आली असून हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे आता मी लवकरच न्यायालयात या सर्व गोष्टी माडणार असल्याचेही बाथेना यांनी सांगितले आहे.