मुंबई- भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेच्या जुईली शेंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. कृष्णा हेगडे हे माजी आमदार असून विलेपार्ले भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत आज विले पार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे व २०१९च्या विले पार्ले विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे ह्यांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी परिवाहन मंत्री, विभाग प्रमुख अनिल परब व युवासेना सचिव वरूण सरदेसाई उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे भाचs समीर कामत यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज सेनेने भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या झटका देत माजी आमदार हेगडे यांना शिवबंधन बांधले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतदेखील पडझडीला सुरुवात झालेली आहे. विले पार्ले 2019 च्या विधानसभेतील मनसेच्या उमेदवार जुईली शेंडे यांनीदेखील आज सेनेत प्रवेश केला आहे. एका बाणात सेनेने दोन राजकीय पक्षांना घायाळ केले आहे.
हेही वाचा-'जनतेची सहानुभूती मिळविण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न'
कोण आहेत कृष्णा हेगडे ?
कृष्णा हेगडे हे आता भारतीय जनता पक्षातून सेनेत गेले असले तरी ते मूळचे काँग्रेसचे आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २००९ साली कृष्णा हेगडे यांनी विलेपार्ल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४ साली भाजपाच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे ते जावई आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेनेही त्रास दिल्याचे हेगडे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
हेही वाचा-मराठा आरक्षणाच्या निर्णायक टप्प्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी करावी - विनोद पाटील