मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ती व संस्थांना पुरस्कृत केले जाते. महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केली. यवतमाळ जिल्ह्यातील कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाल्याचे सावंत यांनी सांगितले.
सन 2009 -10पासून शासकीय योजनांची गावांमध्ये उत्कृष्ट अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणारी गावे, संस्था तसेच व्यक्तींना आदर्श गाव योजनेअंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात येते. उत्कृष्ट आदर्श गाव पुरस्कारामध्ये द्वितीय क्रमांकासाठी (तीन लाख रु.) नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) व पुणे जिल्ह्यातील भागडी (ता. आंबेगाव) या गावांची तर तृतीय क्रमांकासाठी (दोन लाख रु.) नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता. उमरेड) व रत्नागिरी जिल्ह्यातील विरसाई (ता. दापोली) या गावांची विभागून निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वय अभिकरण संस्था गटात प्रथम क्रमांक (एक लाख रु.) ज्ञानशक्ती विकास वाहिनी, डीएसके बिल्डिंग, मंचर, ता. आंबेगाव यांना तर द्वितीय क्रमांक (50 हजार रु.) प्रादेशिक बहुद्देशीय शिक्षण व आरोग्य सेवा संस्था, मु.पो. गोधनी, ता. उमरेड, जि. नागपूर व तृतीय पुरस्कार (20 हजार रु. ) विकास सामाजिक संस्था, वरोरा, जि. चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक (25 हजार रु.) सुनील दत्तात्रय पावडे, कोठोडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना तर द्वितीय पुरस्कार (15 हजार रु.) काशिनाथ यादवराव शिंपाळे, शेळगाव गौरी, ता. नायगाव, जि. नांदेड आणि तृतीय पुरस्कार (10 हजार रु. विभागून) परम तुकाराम काळे, गोधनी, जि. नागपूर व ज्ञानेश्वर वसंत उंडे, भागडी, ता. आंबेगाव, जि. पुणे यांची निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकरच होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.