मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातील वातावरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या कथित पत्रामुळे तापले आहे. या कथित पत्रामधून परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याला दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट त्यांनी दिल्याचा आरोपही या पत्रात केला आहे.
- माझी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटले आहे की त्यांच्या बदलीसाठी गृहमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या कारण हे सत्य नाही. या पत्रामध्ये मी नमूद केलेल्या गोष्टींवर कारवाई करावी, अशी मागणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातून केली आहे. इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये मी 32 वर्ष दिलेली असून माझ्या पोलीस खात्यामध्ये सुरू असलेल्या काही गोष्टी मी आपणास निदर्शनास आणून देत आहे.
- 17 मार्च रोजी राज्याचे गृह विभागाकडून मला मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदलून राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख पद देण्यात आल्यानंतर मी 18 मार्च रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. माझी बदली ही कलम 22N(2) महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार कारण देऊन करण्यात आलेली आहे. ही बदली अँटिलिया इमारतीच्या तपास संदर्भात कुठलाही पक्षपातीपणा होऊ नये म्हणून करण्यात आल्याचे कारण देण्यात आलेले आहे.
- 25 फेब्रुवारी रोजी गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडी मध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संदर्भात माझ्या कार्यालयांमधून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. एटीएसकडून याचा योग्य दिशेने तपास सुरू होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनसुद्धा याचा तपास केला जात होता.
- 18 मार्च रोजी माध्यमाच्या एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणांमध्ये मुंबई पोलीस आयुक्त पदावर राहून माझ्याकडून मोठ्या चुका घडल्या असल्याचे म्हटले. या चुकांकडे दुर्लक्ष करता येणार नसून माझी बदली करण्यात आल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.
- ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरा मी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना या संदर्भात माहिती देण्यासाठी पोहोचलो होतो. या वेळेस गृह खात्याकडून सुरू असलेल्या काही गोष्टींच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह इतर काही जणांना सध्या सुरू असलेल्या काही चुकीच्या गोष्टींबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्या ठिकाणी हजर असलेल्या काही इतर मंत्र्यांनी मी सांगणार असलेल्या गोष्टींबद्दल अगोदरच याची कल्पना संबंधितांना देऊन ठेवली होती.
- मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की, मुंबईत 1750 बार आहेत. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास 40 ते 50 कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले 50 कोटींच्या टार्गेटसाठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
- याबरोबरच मुंबई पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेचे एसीपी संजय पाटील यांना सुद्धा बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. त्यांनाही अशाच प्रकारचे 40 ते 50 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये 16 मार्च 2019 च्या दिवशी एसीपी पाटील व परमबीर सिंग यांच्या दरम्यान घडलेल्या मेसेजचा तपशील देत म्हटले आहे, की 16 मार्च रोजी त्यांना गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आलेले होते. याठिकाणी सचिन वाझे यांनासुद्धा बोलावण्यात आले होते. मुंबई शहरात असलेल्या हुक्का पार्लर, डान्स बार व बार अँड रेस्टॉरंटच्या संदर्भातील वसुलीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.
- दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात सुसाईड नोटच्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे नोंद घेण्यात यावा, म्हणून गृहमंत्री हे आग्रही होते. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी माझा अनुभव त्यांना सांगून या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करावी, असे सुचवले होते. प्रथम दर्शनी डेलकर यांनी आत्महत्या केली होती. यास त्यांनी दादरा -नगर हवेली येथील प्रशासन व काही अधिकार्यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांकडून करण्यात यावा, असे मी सुचवले होते.
- मात्र, असे असतानासुद्धा माझे मत गृहीत न धरता गृहमंत्र्यांनी यासंदर्भात एसआयटीची घोषणा केली होती, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग यांनी म्हटले आहे, की गेल्या दीड वर्षाच्या माझ्या मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत गृहमंत्र्यांनी सतत माझ्या कार्यालयात फोन करून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. जे कायद्याच्या चौकटीत बसत नसून संविधानाच्या विरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
- परमवीर सिंग यांनी यासंदर्भात म्हटले आहे, की जे काही घडले त्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी पूर्ण जबाबदारी घेतलली होती. मात्र, इतर ठिकाणावरून होणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दलसुद्धा या ठिकाणी नमूद करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. राज्यात इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये राहून मी 32 वर्ष दिलेली आहेत. या कार्यकाळात मला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याचे परमबीर सिंग यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
- मी या पत्रामध्ये नमूद केलेल्या गोष्टींबद्दल आपण योग्य ती सत्यता पडताळून पहा व त्या संदर्भात योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगत असल्याचे परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, ईटीव्ही भारत प्रतिनिधीचा आढावा
हेही वाचा-आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी