मुंबई - मुंबईतील ट्रॅफिक ( Divorce Due To Traffic ) जामच्या समस्येमुळे 3% घटस्फोट होतात. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे हे सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केले होते. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस ( Kishori Pednekar Critisized Amruta Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी हा जावईशोध कुठून लावला, असे त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर -
ज्याचे त्याचे क्षेत्र आहे, त्याने त्या क्षेत्रात काम करावे. आम्ही त्यांना कुठल्या भूमिकेत बघायचे? सामान्य स्त्री की माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून बघायचे? असा प्रश्न पेडणेकरांनी विचारला. तसेच असा जावईशोध करून मुंबई किंवा महाराष्ट्राला मलिन करण्याचा प्रयत्न करु नये. 2019ला जे राजकीय बदल झाले, त्यावरून मला वाटतं आधी भाजपाचे पुरुषच हैराण होते. पण आता घरच्या महिलादेखील हैराण झाल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी सामान्य महिला म्हणून केंद्रातील विषयांवरही बोलावे, असा टोलाही त्यांनी लगावला. वक्तव्य केले ते चुकीचे आहे ही वृत्ती महाराष्ट्राला अधोगतीला नेते आहे.
'वहिनींनी नवा शोध लावला आहे' -
दरम्यान, यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे ( Manisha Kayande Critisized Amruta Fadnavis ) यांनी अमृतांना टोला लगावला आहे. मुंबईतील ट्रॅफीकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात, असा वहिनींनी नवा शोध लावला आहे. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप बौद्धिक घेते, तेथे कधी तरी वहिनींनासुद्धा बोलवा, असा टोला त्यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस -
मी घराच्या बाहेर पडते तेव्हा मुंबईतील रस्त्यावर सर्वत्र खड्डे दिसतात. माझ्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. याप्रकरणात कोणी बोलायला तयार नाही. सामान्य माणूस म्हणून मी बोलत असते. मला देवेंद्र फडणवीसांची पत्नी समजू नका. एक सामान्य नागरिक म्हणून मी समस्या मांडत असते. या मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट झाले आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.