मुंबई- सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार स्थगिती सरकार असल्याचा आरोप केला आहे. त्यात भर म्हणून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हप्ता चालू, काम बंद असा आरोप आता सरकारवर केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यानंतरही मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली नसल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहायला लागले. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केले.
राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होताच आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊ, असे वचन दिले होते. त्या प्रमाणे आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली. इतर कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र, मेट्रोची मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर आदी भागातील कामे बंद आहेत. काम बंद करून हप्ता चालू करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा शिवसेना महाआघाडी सरकारचा चमत्कार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.