मुंबई - गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे कारखान्यांमध्ये शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांनी महाविकास आघाडीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला होता. कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा आरोप सोमैयांनी केला होता. मुंबईत गेल्यानंतर या घोटाळ्यासंदर्भाची कागदपत्र आपण ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाला देणार असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले. त्याप्रमाणे आज (मंगळवारी) दुपारी ईडीच्या कार्यालयात जाऊन सोमैया यांनी कागदपत्र ईडीकडे सुपूर्द केली आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावई यांनी शेल कंपनीच्या मार्फत हा घोटाळा केला आहे. ब्रिक्स इंडिया कंपनीला संबंधित कारखाना चालवायला दिला होता. या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचे किरीट सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
'मला कागदपत्र कोठून मिळाली याचा तपास मुख्यमंत्र्यांनी करावा'
घोटाळा संबंधीची कागदपत्र आपल्याला कोठून मिळाली याचा तपास मुख्यमंत्र्यांनी करावा. याबाबत मी काहीही बोलणार नाही. ज्यांनी मला ही कागदपत्र दिले आहेत, त्यांना मी कोणत्याही परिस्थितीत वाचवणार. मात्र मला ही कागदपत्रे रामदास कदम यांनी दिली नाहीत, असे किरीट सोमैया यांनी आवर्जून सांगितले.
'पवार आणि वळसे पाटील यांच्या सांगण्यावरून घरात डांबले'
19 सप्टेंबरला आपल्या राहत्या घरी पोलिसांनी आपल्याला चार तास डांबून ठेवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी आपल्याला दाबून ठेवल असल्याचे यावेळी किरीट सोमैया यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी कॉंग्रेस पक्ष सोडला नव्हता, तर त्यांची हकालपट्टी झाली होती - रामदास आठवले