मुंबई - मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवली. आता आरक्षण घालवल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कोणी आंदोलन करीत असेल, तर त्याला घाबरून निव्वळ अफवा पसरवण्यातचे उपटसूंभ धंदे सचिन सावंतांनी बंद करावे, असा इशारा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
'प्रचंड परिश्रमाने मिळवलेले आरक्षण या सरकारने घालवलेल'
"सेव्ह मेरिट सेव्ह नेशन"ला कोण कोणत्या नेत्यांनी देणग्या दिल्या याचीही माहिती आहे. त्यामुळे निव्वळ अफवा पसरवण्याचा आपला छंद सचिन सावंत यांनी किमान या संवेदनशील विषयात तरी जपू नये. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयात त्या समाजाशी असा पोरखेळ करण्याचा कोणताही अधिकार सचिन सावंत यांना नाही आहे. मुळात गेली साठ वर्ष जो प्रश्न तुम्ही खीतपत ठेवलात ते मराठा आरक्षण मिळवून देण्याचे काम आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, एवढेच नाही तर उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवले सुद्धा पण सर्वोच्च न्यायालयात निव्वळ तारखा मागण्याच्या आणि गायकवाड आयोगाच्या परिशिष्टचे भाषांतरच सादर करायचे नाही, असे प्रकार याच सरकारने केले त्यामुळे प्रचंड परिश्रमाने मिळवलेले आरक्षण या सरकारने घालवलेले आहे.
'मराठा समाजासोबत आम्ही सत्तेत असतानाही होतो आणि यापुढेही राहू'
मराठा समाजासोबत भाजपाने ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गोष्टीवरून सचिन सावंतांना पोटशूळ का उठावा? मराठा समाजासोबत आम्ही सत्तेत असतानाही होतो आणि यापुढेही राहू. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांच्या पायात पाय टाकायचे हीच काँग्रेस पक्षाची कायम संस्कृती राहिलेली आहे. स्वतःच्या पक्षांतर्गत सवयी किमान पक्षाबाहेर तरी त्यांनी वापरू नये. मराठा आरक्षण विरोधी याचिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवली होती. भाजपाला सुपर स्प्रेडर म्हणताना आपल्या पक्षाने या देशाला किती कीड लावून ठेवली याचे आत्मचिंतन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले पाहिजे, असा टोला देखील या वेळेस भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला.