मुंबई - बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणची तत्कालीन मॅनेजर करिष्मा प्रकाशला आज चौथ्यांदा नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलच्या कार्यालयात यावे लागले. 15 ते 20 मिनीटं ती कार्यालयात होती.
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी सुरू असताना अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाश आज पुन्हा एनसीबी कार्यालयात हजर झाली होती. ती एनसीबी कार्यालयात चौथ्यांदा आली असून केवळ 15 मिनिटांसाठी हजर होती. या वेळी तिने काही महत्त्वाची कागदपत्रे एनसीबी अधिकाऱ्यांना दिली आहेत. करिष्मा प्रकाशची अंमली पदार्थ बाळगणे आणि विकणे या प्रकरणात चौकशी सुरू आहे.
करिष्माच्या घरावर एनसीबीचा छापा
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाशच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापा टाकण्यात आला होता. तिने एनडीपीएस कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका देखील दाखल केली. त्यावर 3 नोव्हेंबरला सुनावणी पार पडली. मात्र करिष्मा सुनावणीसाठी हजर झाली नाही. तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. करिष्माचा जबाब घेण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तिला समन्स बजावण्यात आले.
छाप्यात सापडले अमली पदार्थ - एनसीबीचा दावा
एनसीबीने करिष्मा प्रकाशच्या घरावर छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले होते. तिच्या घरात चरस आणि सीबीडी ऑइल आढळल्याचे एनसीबीने सांगितले. मात्र करिष्मा प्रकाश घरात नसताना एनसीबीने टाकलेला छापा कायद्याच्या विरोधात असल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलंय. एखादी व्यक्ती तिच्या घरात हजर नसेल तर, तिच्या घरातून एनसीबीला अमली पदार्थ कसे काय मिळाले? असा सवालही तिच्या वकिलांनी उपस्थित केला आहे. करिष्मा प्रकाश हिला यााधी तीन वेळा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी करिष्माने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य केले होते. आता चौथ्यांदा ती हजर झाली आहे.