मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ११ उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi In MLC Election ) आणि विरोधीपक्ष भाजपाची ( BJP In MLC ) उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
एकूण ११ उमेदवार रिंगणात : भाजपाचे प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे, प्रसाद लाड हे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी २६ मतांची गरज आहे. कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप आणि भाजपाचा पाचवा उमेदवार प्रसाद लाड निवडून कसे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजपाने जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपाला मुंडे, खडसे समर्थकांची धास्ती : विधानपरिषदेची निवडणूक अवघ्या तासांवर येऊन ठेपली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आमदारांचे दोन दिवस हॉटेल पॉलिटिक्स रंगले. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सहावी जागा जिंकून चमत्कार घडवला. हा विजय महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का देणारा असून फडणवीस यांचे दिल्लीत वजन वाढवणारा ठरला. विधानपरिषदेत याची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीला दगाफटका होऊ नये यासाठी सर्वपक्षीय आमदार डोळ्यांत तेल घालून आहेत. तर पंकजा मुंडे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थक आमदार नाराज आहेत. त्यामुळे मुंडे आणि खडसे समर्थकांच्या मत विभागणीची भाजपाला धास्ती आहे. राज्यसभेत अपक्ष आणि छोटे पक्षांची मते निर्णायक ठरली. आताही ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र ही निवडणूक गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे होणार असल्याने सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेना वचपा काढणार ? : शिवसेनेकडे समर्थन दिलेल्या आमदारांसहित ६२ इतके सर्वाधिक संख्याबळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिल्लक मतांसाठी शिवसेनेकडे पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऐनवेळी आपला कोटा जाहीर करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार धाकधूक वाढली आहे. मात्र राज्यसभेचा वचका काढण्यासाठी शिवसेनेने तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार यामुळे निवडून येतील, असा अंदाज वर्तवला जातो आहे.
हेही वाचा - MLC Candidates Profile : विधानपरिषद निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात; जाणून घ्या, राजकीय कारकीर्द