मुंबई - मुंबईत कोरोना आटोक्यात ( Mumbai Corona Update ) असल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दहापैकी चार जम्बो कोविड सेंटर बंद ( Jumbo Covid Centers Closed in Mumbai ) करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या आरोग्य सुविधा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात चार जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. यातील ५ हजार बेड, २०० आयसीयू आणि १०० व्हेंटिलेटरचा समावेश आहे.
४ जम्बो कोविड सेंटर बंद -
मुंबईत डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रोजची रुग्णसंख्या २० हजारांवर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण आला. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पालिका तसेच राज्य सरकारपुढे आव्हान उभे राहिले होते. मात्र एका महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या दररोज सुमारे २० हजारपर्यंत चाचण्या होत असून शंभरच्य़ा आत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पालिकेने दहिसर, नेस्को गोरेगाव, कांजूरमार्ग आणि मुलुंड असे ४ जम्बो कोविड सेंटर बंद केले आहे. या ठिकाणी असणार्या आरोग्य सुविधांची मुव्हेबल आणि नॉट मुव्हेबल अशी यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये बेडसह ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, विद्युत व्यवस्थेसह मोठ्या सुविधाही पालिकेला मिळणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
पालिकेचे बारा हजार बेड वाढणार -
पालिकेचे सध्या एनएससीआय वरळी, रिचर्डसन क्रुडास भायखळा, बीकेसी, मालाड जम्बो कोविड सेंटर, शीव जम्बो कोविड सेंटर आणि सेव्हन हिल्स रुग्णालय कार्यान्वित आहेत. या ठिकाणच्या सुमारे सात हजार बेड असताना केवळ ५० ते १०० रुग्ण आहेत. मात्र रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याने आगामी काळात सर्व जम्बो कोविड सेंटर बंद होऊन या ठिकाणची सुमारे सात बेड पालिका रुग्णालयांसाठी उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयात त्यामुळे बेडची संख्या आणखी बारा हजारांनी वाढणार आहे.