मुंबई - मार्च 2020 पासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने ३१ मार्च २०२१ पर्यंत सात जम्बो कोविड सेंटर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनपा रुग्णालयांसहित खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कोविड सेंटर सुरूच राहणार -
कोरोनाचा मार्चमध्ये शिरकाव झाल्यानंतर घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई ठप्प झाली. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवेलाही रेड सिग्नल मिळाला. मनपा आरोग्य खात्याच्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणाला आला आहे. मुंबई उपनगरीय लोकलचे दरवाजे वकिल, खाजगी सुरक्षा रक्षक आणि त्यानंतर महिलांसाठी २१ ऑक्टोबरपासून अटीशर्तीवर लोकल सुरु झाली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल कधी सुरु होणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत होता. अखेर राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांकरिता सुरु करण्यास हिरवा कंदील दिला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, मुंबई मनपाने सुरु केलेले सहा जंम्बो कोविड सेंटर ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरु ठेवली जाणार आहेत. तसेच मनपा रुग्णालयांसहित खासगी रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन अंगलट येणार -
लोकल सेवा सुरु होणार असली तरी प्रवाशांनी तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी टाळणे आदी नियम बंधनकारक केले आहे. प्रवाशांकडून हे नियम पाळले जातात का, याबाबत तपासणीच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, नियमांचे उल्लघंन केल्यास आढळून आल्यास मनपा आणि रेल्वे मार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे.
जम्बो कोविड सेंटर -
दहिसर जम्बो कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को जम्बो कोविड सेंटर, बीकेसी कोविड सेंटर, वरळी डोम, मुलुंड जम्बो कोविड सेंटर, भायखळा येथील रिर्चड सन्स अँड कंपनी.