मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गृहमंत्री देशमुख निलंबित एपीआय सचिन वाझे यांचा वसूलीसाठी वापर करत होते, असा गंभीर आरोप सिंग यांनी पत्रातून केला. गृहमंत्री देशमुख यामुळे गोत्यात आल्याने गाशा गुंडाळणार असून त्या जागी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
वसुलीच्या आरोपामुळे देशमुख गोत्यात-
अँटिलिया समोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेन या व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेल्या अटकेवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले. पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करून सरकारने विरोधकांच्या टीकेची धार कमी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझे यांचा वसुलीसाठी वापर करत होते. त्यांना प्रत्येक महिन्याला शंभर कोटींचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सिंग यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केला. गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले. मात्र, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, राजीनामा घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेणार यावर निश्चित झाल्याचे समजते.
जयंत पाटीलच का?-
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांना गृहमंत्रिपदावरून तडकाफडकी हटविण्यात आले. त्यावेळी डिसेंबर 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवला होता. जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी धुरा सांभाळली. संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सांभाळण्याची ताकद जयंत पाटलांकडेच असल्याने त्यांची वर्णी या लागण्याची शक्यता आहे.