मुंबई - "द काश्मीर फाइल्स" या चित्रपटांमध्ये घटना अतिरंजित करून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सगळं लोकांना दाखवण्याचा भारतीय जनता पक्षाचा आटापिटा आहे. 1990 साली केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. तरीही काश्मिरी पंडितांना निर्वासित व्हावे लागले. त्या वेळच्या परिस्थितीत सर्व आदेश राज्यपालांच्या कार्यालयातून निघाले होते. या सर्व आदेश भाजपकडूनच देण्यात आले असून, त्या आदेशांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची असल्याचे' मत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल आहे.
'आता सात वर्ष केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. मात्र या सात वर्षात काश्मीर मधील किती निर्वासितांचा प्रश्न सरकारने मार्गी लावला? असा प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या सात वर्षात भाजप सरकारने कोणतेही काम केले नाही. म्हणूनच "द काश्मीर फाईल्स" या सिनेमाच्या माध्यमातून विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा' आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
केवळ टोकाची भाषणे
केवळ टोकाची भाषणे भारतीय जनता पक्षाकडून केली जातात. या भाषणातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. मात्र या सर्व मुद्द्यांपासून दूर केवळ सिनेमाच्या प्रमोशन मागे भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
आघाडी सरकारला अडकवण्याचा प्रयत्न
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आता याबाबत निर्णय घेता येणार नाही असं राज्यपालांकडून सांगितले जात आहे. केवळ कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - Interim Relief To Darekar: प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर23 मार्चला सुनावणी, अंतरिम दिलासा कायम