मुंबई - कोणी काही सांगितले म्हणून ब्रिटिशांपुढे माफीनामा सादर करण्याचे समर्थन होऊ शकत नाही. राजनाथ सिंह यांच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या व्यक्तीने सांगितले म्हणून कुणी ब्रिटिशांकडे माफीनामा सादर केला, असे सांगितले जात असेल तर त्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची माहिती देऊन संघाने आणि भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुन्हा-पुन्हा अडचणीत आणू नये, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांनी इंग्रजांपुढे आपला माफीनामा सादर केला होता, असे खळबळजनक वक्तव्य नुकतेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील बोलत होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जर असं वक्तव्य करत असतील तर त्यांनी या संदर्भातील पुरावे उघड केले पाहिजेत, अशी मागणी करीत पुराव्यांशिवाय बोलण्याला काहीही आधार नाही, त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. वास्तविक गांधीजींनी सांगितले म्हणून सावरकरांनी माफीनामा द्यावा याचे ही समर्थन होऊ शकत नाही. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत सातत्याने अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अडचणीत आणत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
हे ही वाचा - मला वाटत नाही की गांधी हे राष्ट्रपिता आहेत - रणजीत सावरकर
काय म्हणाले राजनाथ सिंह ?
अंदमान तुरुंगात कैद असताना स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.सावरकर यांच्याविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आलेल्या आहेत. सावरकर यांनी अंदमान निकोबार तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे पसरवण्यात आले. मात्र, त्यांनी सुटकेसाठी दया याचिका दाखल केल्या नाही. सामान्यपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. महात्मा गांधी यांनी सावरकर यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती, असे राजनाथ सिंह म्हणाले.