मुंबई - विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना 'कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा' हा प्रश्न केला होता. आजही ते टिव्ही बघत असतील आणि त्यांना आता कळेल 'टायगर अभी जिंदा है' आणि 'पिक्चर अभी बाकी है' अशा शब्दात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
पक्ष प्रवेशानंतर जयंत पाटील यांनी खडसे यांचे स्वागत करत त्यांनी केलेल्या राजकीय कार्याचा आणि त्यांच्या राजकारणातील अनुभवांचा गौरव केला. एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र त्यांना भाजपने मागच्या रांगेत बसवण्याचे काम केले.
भाजप पक्ष वाढवण्याचे काम खडसे यांनी केले आहे. काही कानामागून आले आणि तिखट झाले असा प्रकार घडला आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी खडसे प्रयत्न करतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वांनी खडसे यांना काही देतो असं सांगितलं नाही, त्यामुळे मीडियाने चुकीचं काही पसरवू नये अशी विनंती जयंत पाटील यांनी यावेळी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केले.
सुसंस्कृत महाराष्ट्रात जाणीवपूर्वक चांगलं राजकारण चव्हाण साहेबांनी रुजवलं परंतु आज राजकारणातून संपवण्याचे राजकारण घडत आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.
पवारसाहेबांनी घडवलेले नेते ऐन निवडणुकीत पक्षाला सोडून गेले. परंतु पवारसाहेबांचा विचार मानणारे कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले आणि त्यांचे विचार पुढे महाराष्ट्र स्वीकारेल हे आज सिद्ध झाले. पवारसाहेबांच्या अपार कष्टाने आज पक्ष आणि पक्षातील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात शेतकर्यांवर संकट आणि कामगारांवर संकट आले आहे. परंतु त्यांच्या संरक्षणाला धक्का लावण्याचे काम केंद्रातील सरकारकडून केले जात आहे, त्यासाठी आमची सत्ता असली तरी शेतकर्यांच्या व कामगारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करणारा पक्ष आहे. सुखदुःखात धावून जाणारा पक्ष आहे. पवारसाहेब ही पक्षाची ताकद आहे. जिव्हाळाच्या या पक्षात तरुणांना संधी दिली जाते. महाराष्ट्र उभा करायचा म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर पवारसाहेबांनी त्यावेळी जबाबदारी टाकली ती जबाबदारी आम्ही पेलल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.