मुंबई - ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुचवले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन संजय राऊत यांचा समाचार घेतला. राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत 'जो पक्ष यूपीएमध्ये नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही', असा सूचक टोला पटोले यांनी शिवसेनेला लगावला. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले होते संजय राऊत?
यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते.
शिवसेना यूपीएचा भाग नाही - पटोले
राऊत यांच्या विधानामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, तरीही राऊत बोलत आहेत. मात्र, शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत यावर आता काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.