मुंबई - मुंबईमध्ये दुसरी लाट आटोक्यात असली तरी रोज 400 ते 500 च्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच दरम्यान, भायखळा महिला जेलमध्ये एकाचवेळी तब्बल 39 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात कैदी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने, हा जेल सील करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
39 जण पॉजिटीव्ह -
मुंबईत भायखळा येथे महिला कैद्यांसाठी जेल आहे. या भायखळा येथील जेलमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे 17 सप्टेंबरला स्थानिक आरोग्य केंद्रामार्फत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार 19 सप्टेंबरला जेलमध्ये फिव्हर कॅम्प आयोजित करण्यात आला. हा कॅम्प सलग दोन दिवस लावण्यात आला होता. या कॅम्प दरम्यान 120 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये जेलमधील कैदी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
जेल सील -
भायखळा जेलमधील 120 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 39 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 39 पैकी 36 जणांना माझगाव येथील पाटणवाला शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. एक गरोदर महिला असून, तिला उपचारासाठी जिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भायखळा महिला जेलमधील 39 जण पॉझिटिव्ह आल्याने हा जेल सील करण्यात आला असल्याचे मनीष वळंजू यांनी सांगितले.
आतापर्यंत 7 लाख 40 हजार रुग्ण -
मुंबईत मार्च (2020)पासून कोरोनाचा प्रसार आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 40 हजार 761 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 17 हजार 521 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 16 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 676 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1195 दिवस इतका आहे.