पुणे - राज्यातील कोरोनाची परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन तीन जिल्हे सोडले तर पॉझिटिव्ह रेट कमी होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
केंद्राने राज्याला लसीचे झुकते माप द्यावे -
मी स्वतः राज्यात फिरत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात येईल. राज्यात दिवसाला 10 लाख लसीकरण करण्याची क्षमता आहे. आता 21 जूनपासून लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. महाराष्ट्रात ही मोहीम अधिक जलद करण्यासाठी प्रयत्न करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या 10 टक्के जनता महाराष्ट्रात आहे. अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे, असेही टोपे म्हणाले. राज्यात आतापर्यंत अडीच ते तीन कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आणखी 13 डोस महाराष्ट्राला आवश्यक आहेत. हे सर्व काम पुढच्या चार ते पाच महिन्यात संपवायचे आहे. यासाठी केंद्राच्या सहकार्याची गरज आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.
म्युकरमायकोसिससाठी सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे -
रुग्णांनी सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावे, असेही आवाहन त्यांनी नागरिकांना यावेळी केले. सरकारी रुग्णालयात सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आजारावर आवश्यक इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. खासगी रुग्णलयात उपचार घ्यायचे असल्यास, तेथे राज्य सरकारने कॅपिंग केली आहे. तेथे रुग्णांनी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे देऊ नये, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - आशा सेविकांच्या प्रश्नावर चर्चा झालेली असतानाही आंदोलन करणे चुकीचे - आरोग्यमंत्री