मुंबई - अजगराने एका शेळीला गिळंकृत करून शिकार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. मात्र काही वेळा नंतर अजगर गिळलेली शेळी क्षणात बाहेर फेकतो. या घटनेची थरारक दृ्श्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सर्प मित्र रवीश गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने हा चित्तथरारक नजारा कॅमेऱ्यात कैद केला आहे. ही घटना मुंबईतील मीरा रोड काशीद भागात घडली आहे.
येथील काशीद परिसरात अजगर आणि शेळी यांच्यात झटापट सुरू झाली होती. याची माहिती मिळताच नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. अजगराने क्षणात शेळीवर झडप घालून तिला जखडून ठेवले. त्यानंतर त्याने तिला गिळंकृत करण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांची गर्दी असताना देखील अजगराने आपली शिकार सोडली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
अजगराला बकरी शिकार करून गिळण्यासाठी तब्बल दोन तास लागले. मात्र, काही वेळानंतर अजगराने गिळलेली ती शेळी बाहेर काढली. या अजगराने आणखी कोणाला शिकार करू नये याची खबरदारी म्हणून परिसरातील प्राणी मित्रांनी त्या अजगराला पकडले आहे. ते आता त्याला जंगलात सुरक्षित स्थळी सोडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्राणी मित्राच्या म्हणण्या नुसार अजगराने अख्खी शेळी गिळंकृत केली. हे दृश्य पाहताना नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत होता. या परिसरात अनेक जण शेळी पालन करतात. त्यामुळे आज अजगराने केलेली ही शिकार पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अजगराचा या परिसरात नेहमीच वावर राहिला तर शेळी पालन करणे कठीण असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत. तसेच मनुष्याच्या जिवालाही धोका होऊ शकतो अशी चिंताही लोकांनी व्यक्त केली आहे.