मुंबई - पाकिस्तानात छापण्यात आलेल्या भारतीय चलनाच्या हुबेहूब नकली असलेल्या दोन हजारांच्या 22 लाखांच्या बनावट नोटा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर जप्त केल्या आहेत. पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात आणण्यात आलेल्या या नोटा ओळखणे फारच कठीण होते. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या जावेद गुलामनबी शेख (36)यास अटक करून त्याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - बनावट कॉल सेंटर प्रकरणी केरळमधून एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 2 जवळ अटक आरोपी दुबईवरून दाखल झाला असता, गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटून आल्या. जावेद याने 2 हजाराच्या तब्बल 22 लाखांच्या नोटा त्याच्याकडील वेगवेगळ्या बॅगेत लपवल्या होत्या. पोलिसांनी विमानतळावर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, सदरची रक्कम मिळून आली. पाकिस्तानातून दुबईमार्गे या बनावट नोटा मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वितरित करण्यासाठी आणल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत कबूल केले आहे. या अगोदरही त्याने दुबईमार्गे बनावट नोटा भारतात आणल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी घातपाती कारवाया करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर केला जाणार असल्याची शक्यता असून या रॅकेटमधील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.