मुंबई - शिवसेनेच्या समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही महिला नगरसेवक उपस्थित होत्या. त्यांचाही लवकरच प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - जळगाव: सुवर्णनगरी गजबजली! दसर्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीकरता ग्राहकांची गर्दी
आमदार गीता जैन यांनी आज केलेल्या पक्ष प्रवेशामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. सध्या या महापालिकेत भाजपची सत्ता असून, जैन यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशामुळे अनेक भाजप समर्थक आमदारही शिवसेनेत येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जैन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गीता जैन या पूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर होत्त्या. ठाणे जिल्ह्यात असलेल्या इतर महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, परंतु मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आतापर्यंत शिवसेनेला येथे यश आले नाही. मात्र, गीता जैन यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेला याठिकाणी मोठे पाठबळ मिळणार आहे. तसेच भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठीचा मोठा फायदा होऊ शकतो, असा विश्वास शिवसेनेतील नेत्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला.
मीरा भाईंदर पालिकेचे समीकरण बदलणार - सेना आमदार प्रताप सरनाईक
शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मीरा भाईंदर पालिकेचे समीकरण येत्या काळात बदलणार आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणुकीत मीरा भाईंदरमध्ये आमची एकहाती सत्ता येईल. भाजप नगरसेवक मोठ्या प्रमाणात आमच्या संपर्कात आहेत. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद आहे. २२ नगरसेवक सेनेचे आहेत आणि गिता जैन यांच्यामुळे आणखी बळ मिळेल. पक्ष वाढीसाठी जैन यांचा मोठा फायदा होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशानंतर गीता जैन म्हणाल्या, मी यापुढे मीरा भाईंदरमध्ये शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करेल, मीरा भाईंदरमध्ये भाजपला फटका बसेल का? हे त्यांना येत्या काळात लक्षात येईल, असे त्या म्हणाल्या.