मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. मात्र, ही मागणी मान्य न झाल्यामुळे उद्यापासून राज्यभर एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार आहे. यामुळे उद्या राज्यभरतीला नागरिकांना मोठ्या समस्याना समोर जावे लागणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष
एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिने वेतन मिळत नव्हते. तसेच कमी वेतन असल्याने एसटी कर्मचारी हवालदील झाले होते. हे वेतन रखडण्याची रडगाणे सध्या सुरुच आहेत. एसटी. कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार मिळत आहे. लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन (निव्वळ देय) देणे कठीण झाले आहे. घरभाडे, रेशन, आई-वडीलांचे आजारपण, मुलांचे शिक्षण इतर कर्ज, उसनवारी या देणी असल्याने दिवाळी सण साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्ता देण्याची मागणी एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली होती. याबाबत पत्र सुद्धा महामंडळाला देण्यात आले होते. मात्र, या पत्राची दखल घेतली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापले असून उद्या (मंगळवार) पासून राज्यभर एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसणार आहे.
केवळ 17 टक्के महागाई भत्ता
एसटी कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन न झाल्यानं कर्मचाऱ्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झालेली आहे. त्यामुळे 25 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना एसटी महामंडळामध्ये नुकत्याच घडलेल्या आहे. या सर्व बाबींचा विचार एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ आणि त्याची थकबाकी दिपावळी पूर्वी देण्याची मागणी संयुक्त कृती समितीच्यावतीने केली होती. परंतु काल परिवहन मंत्री महोदयांनी केवळ दिवाळी पूर्वी वेतन, दिवाळी भेट आणि फक्त पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळतो. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांना केवळ 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. घरभाडे भत्त्याचा दर आणि वार्षिक वेतन अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.
हेही वाचा - भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार रोखण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढणे गरजेचे -सोनिया गांधी
आंदोलन चिघळल्यास सरकार जबाबदार
महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, 26 कर्मचाऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकारला व एसटी प्रशासनाला जाग येत नाही. 2500 दिवाळी भेट व 5% महागाई भत्ता देऊन जखेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे. सरकार आता आम्ही आत्महत्या करायची वाट पाहत आहे का? बुधवारपासून पासून राज्यभर एस टी कर्मचाऱ्याचे उपोषण होत आहे.कर्मचाऱ्याचा असंतोष पाहता आंदोलन चिघळल्यास त्याची जबाबदारी राज्य शासन व एसटी प्रशासनाची राहील.
काय आहे मागणी
१ एप्रिल, २०१६ पासून शासनप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा.
वार्षिक वेतनवाढीचा दर ३% प्रमाणे देण्यात यावा.
घरभाडे भत्ता ८, १६, २४ % प्रमाणे देण्यात यावे.
शासनाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर देऊन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी.
उद्याचा आंदोलनात १७ संघटना सहभागी होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण १७ संघटना उद्याचा बेमुदत उपोषणात सहभागी होणार आहे.
हेही वाचा - मुंबईतील सोमैया महाविद्यालयात आजपासून लसीकरण; काल 32 कॉलेजमधील 3920 विद्यार्थ्यांनी घेतली लस