मुंबई: गावदेवी परिसरातील केनडी ब्रिज जवळून सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील पाळीव श्वानाला फिरण्यासाठी बाहेर आलेल्या तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला (Indecent act in front of young lady) 100 दिवसा च्या तपासानंतर 500 सीसीटीव्ही तपासुन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी राम लखन कन्हैयालाल हा मूळचा उत्तर प्रदेश मधील रहिवासी आहे. पोलिसांकडून 24 तासात दोष आरोप पत्र सादर करून मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा आणि पाचशे रुपयाचा दंड ठोठावण्यात (immediate punishment) आला आहे.
गावदेवी पोलीस ठाण्या कडुन मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर 7 ऑक्टोबर रोजी 24 तासांच्या आत आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी आणले आणि 2 दिवसांच्या खटल्यात पीडितेची साक्ष तसेच सीसीटीव्ही फुटेज पंच आणि तपासी अधिकारी यांची तपासणी या बाबीनंतर आरोपीला 6 महिने साधी कैद आणि 500 रुपये दंड ठोठावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास केनडी ब्रिज जवळून पाळीव श्वानाला घेऊन जात असलेल्या तरुणीकडे पाहत एकाने अश्लील कृत्य केले या प्रकाराने ती घाबरली तीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्रीनिवास दराडे, संदीप माने, अंमलदार नरेंद्र कांबळे, विवेक तोडणकर, कदम, अवधूत राणे यांनी तपास सुरु केला.
परिसरातील जवळपास 500 सीसीटीव्ही तपासले. आणि मिळालेल्या फुटेजवरून आरोपीचा शोध सुरु केला. तो उत्तरप्रदेशचा रहिवासी असून परीसरात काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. 100 दिवसापासून पथक दिवसरात्र त्याच्या मागावर होते. अखेर तो मुंबईत आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत तो पेंटर म्हणून काम करत असून फुटपाथवर राहतो अशी माहिती त्याने दिली. घटनेनंतर तो गावी पळून गेला होता. तसेच नशेत त्याने कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.