मुंबई - मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. वर्षभरानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागल्याने मुंबईत पुन्हा अंशत: लॉकडाऊन लावण्याचे संकेत पालिका प्रशासन आणि मुंबईच्या महापौरांनी दिले आहेत. यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात अंशतः लॉकडाऊन लावताना कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्याची तयारी पालिकेने केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत विशेष करून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात ९० टक्क्याहून अधिक रुग्ण इमारतींमधील आहेत. यामुळे मुंबईमधील इमारती पालिका प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.
पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने -
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत जनता कर्फ्यू व नंतर लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर हॉटेल, पब, रेस्टोरंट, लग्न समारंभ सुरु झाले. जून जुलैपर्यंत आटोक्यात असलेला कोरोना ऑगस्टमध्ये धार्मिक सणांनंतर पुनः वाढू लागला. डिसेंबर आणि जानेवारीदरम्यान कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला. १ फेब्रुवारीपासून लोकल ट्रेनमधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली. मुंबईत गर्दी वाढू लागली तशी रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईमधील रुग्णसंख्या हजाराच्या वर आहे. गेल्या दोन दिवसात पंधराशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या अशीच वाढू लागली तर मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबईत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये झोपडपट्टी आणि चाळींपेक्षा इमारतीमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. इमारतीमध्ये ९० टक्क्याहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी पालिकेने आपले लक्ष इमारतींकडे वळविले आहे. ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. अशा इमारती पालिका सील करत आहेत. तर ज्या इमारतीत रुग्ण आढळून येत आहेत ते मजले सील केले जात आहेत. मुंबईत सध्या २१४ इमारती आणि २६०१ मजले सील करण्यात आले आहेत. तर २१४ झोपडपट्ट्या आणि चाळी सील करण्यात आल्या आहेत. ज्या इमारतींमध्ये रुग्ण आढळून आले आहेत त्याठिकाणी रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास त्याची माहिती पालिकेला देण्याचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्या रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.
मुंबईत के पश्चिम अंधेरी पश्चिम, टी वॉर्ड मुलुंड, एल वॉर्ड कुर्ला , एस वॉर्ड भांडुप एफ नार्थ माटुंगा वडाळा, एच पश्चिम सांताक्रूझ, एम पश्चिम व पूर्व चेंबूर या विभागात रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने या विभागांवर नजर ठेवली जात आहे. अंधेरी, मुलुंड, माटुंगा, वडाळा या विभागात जाऊन तेथील परिस्थिती, वाढती रुग्ण संख्या याचा शनिवारी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेणार आहे. सध्या लाॅकडाऊनची परिस्थिती नसली तरी ज्या विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्या विभागात कोरोना नियमांची आणि कंटेनमेंट झोनची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केल्यास त्या विभागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल होणार आहे. यामुळे नागरिकांना येत्या काही दिवसात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
हे ही वाचा - विद्यार्थ्यांचे प्रकरण हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग अपयशी -अजित पवार
झोपडपट्टीत अँटीबॉडीचे प्रमाण अधिक -
मुंबईत कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात झाला याची माहिती मिळण्यासाठी पालिकेने सेरो सर्व्हे केले आहेत. पहिल्या सर्व्हेत झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के ऍन्टीेबॉडीज निर्माण झाल्या आहेत. दुसऱ्या सर्व्हेत झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के आढळून आले आहेत. तर तिसऱ्या सर्व्हेत झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४६ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे २१ टक्के आढळून आले आहेत. यावरून झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोना होऊन गेला मात्र त्याची माहिती तेथील नागरिकांना झालेली नव्हती. झोपडपट्टी भागातील नागरिकांनी कोरोनाला हरवले असे म्हणायला हरकत नाही.
अंशतः लाॅकडाऊनची शक्यता - महापौर
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. झोपडपट्ट्यात कोरोना पसरण्याची जास्त भीती होती. झोपडपट्ट्यांमधील कोरोना रोखण्यात पालिकेला यश आले आहे. झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सध्या वाढणारा कोरोनाचा संसर्ग उच्चभ्रु वस्त्यांमध्ये अधिक आहे. हा प्रसार वेगाने होतोय, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईकरांनी खूप सहकार्य केले असून पुढील काही दिवस मुंबईकरांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक ठिकाणी नागरिक कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र अंशतः लॉकडाऊन लावावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - भाजप नेते डिस्टर्ब.. सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी - नाना पटोले
कोरोना रुग्ण आकडेवारी -
मुंबईत गेले दोन दिवस १५०० च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. काल गुरुवारी १,५३९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ३७ हजार १२३ वर पोहोचली आहे. एकूण मृतांची संख्या ११,५११ झाली आहे. तर एकूण ३ लाख १३ हजार ३४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत ११,३७९ अॅक्टीव रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही २१५ वर घसरला आहे.