मुंबई: कोरोनाच्या तिसर्या लाटेत मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ६०० पेक्षा जास्त गरोदर महिला कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांमध्ये तापाची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. मात्र या महिला लवकर बऱ्या होत असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, गरोदरपणा दरम्यान महिलांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
नायर रुग्णालयात २५० गरोदर
मुंबईतील बाई यमुनाबाई नायर रुग्णालयात २५० गरोदर महिला कोरोनारुग्ण आहेत. कामा आणि ऑलब्लेस रुग्णालयात १६१, केईएम रुग्णालयात ४० तर लोकमान्य टिळक सायन रुग्णालयात पाच गरोदर महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच अन्य नर्सिंग होम मध्ये सुमारे १०० गरोदर महिला कोरोना बाधित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महिलांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे
गरोदर महिलांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा लवकर होण्याची शक्यता असते. महिलांनी आपली दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच सोबत महिलांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घ्यायलाच हवेत असे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांनी सांगितले. यापूर्वी महिलांना कोरोना बाधा झाली असता फुफ्फुसाचा संसर्ग होत असे मात्र आता त्याचे प्रमाण कमी झाले असून केवळ तापाची लक्षणे दिसून येत आहेत.
लसीचा दुष्परिणाम होत नाही
गरोदरपणा दरम्यान लस घेतल्यास त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, मातेवर अथवा बाळावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत उलट लस घेतल्याने त्याचा फायदा अधिक होतो. कोरोनाची बाधा होण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे लस घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.