मुंबई - भाजपशी आमचे आता काही संबंध राहिले नाहीत. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र राहिल्यास चांगलेच होईल, असे माझे मत आहे. मात्र, दोन्ही पक्षांना हे आता नको आहे, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. शिवसेना आणि भाजप हे भविष्यात एकत्र काम करतील, मात्र एकत्र येतील की नाही याबाबत काही सांगू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे हे योग्य तो निर्णय घेतील असेही जोशी म्हणाले.
लोकसभेमध्ये काल नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडण्यात आले. शिवसेनेने काल त्याबाबत मतदानदेखील केले. मात्र, आज उद्धव ठाकरे यांनी आपला पवित्रा बदलला. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही याला पाठिंबा देणार नाही, आणि लोकसभेमधील भूमिका ही राज्यसभेमध्ये बदलूही शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबत जोशी यांचे मत विचारले असता, ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम राहील.
सरकार स्थापन होऊन १० ते १२ दिवस होऊन गेले, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. याबाबत बोलताना जोशी यांनी येत्या एक-दोन दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.
एकनाथ खडसे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहेत. यामध्ये कितपत तथ्य आहे असे विचारले असता, याबाबत खडसे हे उद्धव ठाकरेंना भेटून योग्य तो निर्णय घेतील, असे जोशी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : नाथाभाऊसारखे लोकनेते जर आमच्या पक्षात आले तर आनंद होईल - बाळासाहेब थोरात