मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांमधील नागरिक पाण्याच्या अनधिकृत पाईपलाईनमुळे त्रस्त झाले आहेत. या पाईपलाईनमुळे नाल्यांचे पाणी तुंबून ते स्थानिकांच्या घरात जात आहे. सांताक्रूझ पूर्वेला गाव देवी परिसरातील वाकोला पाईपलाईन दत्त मंदिर रोड रामेश्वर शाळेच्या मागे मिलिंद नगर, मोसंबी तबेला, मिलिंद नगर, शिवकृपा चाळ, जय भवानी चाळ, वाघरी वाडा या चाळी आहेत. साधारण 46 हजार लोकसंख्या असलेला हा परिसर. या भागातील लोक अनधिकृत पाईपलाईन मुळे त्रस्त झाले आहेत.
नेमकी परिस्थिती काय ?
साधारण 46 हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात जवळपास अडीचशे पाईपलाईन आहेत. यातील निम्म्याहून अधिक पाईपलाईन या अनधिकृत आहेत. या अनधिकृत पाईपचा गुंता झाल्यामुळे नाल्यातील सांडपाणी वाहण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे नाल्यातील तुंबलेले पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. स्थानिकांनी महानगरपालिकेकडे वेळोवेळी तुंबलेल्या गटारांबाबत तक्रारी दिल्या. तक्रारीची दखल घेऊन महानगरपालिकेचे कर्मचारी येतात आणि येथील परिस्थिती बघून 'या पाईप लाईन मध्ये आमचं सफाईचे सामान आत मध्ये जात नाही' असं कारण देऊन पुन्हा निघून जातात.
परिस्थिती 'जैसे थे'
नागरिकांच्या समस्यांवर थेट उपाय म्हणून पालिकेने अनधिकृत नळ पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेकडून पाण्याच्या लाईन कापण्यात आल्या. तसेच जे लोक आपल्या पाण्याची बिल दाखवतील त्यांच्याच पाण्याच्या लाईन पुन्हा जोडण्यात आल्या. व उर्वरित पाईप लाईन पालिकेने काढून टाकल्या. मात्र काही दिवसातच अनधिकृत नळ पाणी धारकांनी स्थानिक ठेकेदारांना हाताशी धरून त्यांचे पाईपलाईन पुन्हा सुरू करून घेतल्या. त्यामुळे परिस्थिती पुन्हा जैसे थे राहते.
दुषित पाण्यामुळं आजारपण -
या भागातील स्थानिक रहिवासी असलेले सुनील साखरे सांगतात की, "या अनधिकृत पाईप लाईनमुळे आम्हाला दुषित पाणी प्यावे लागते. कधी कधी हे पाणी इतकं घाण असते की आमच्या घरातील लोक गंभीर आजारी पडतात. आमची महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी जातीने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा." यासंदर्भात आम्ही एच वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, "स्थानिकांनी आम्हाला अनधिकृत पाईपलाईन संदर्भात लेखी तक्रार द्यावी पालिका त्वरित त्याच्यावर कारवाई करेल", असे म्हणाले.