मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. मुंबईतील इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असतानाही, त्या इमारतींमधील रहिवाशी नियमांचे पालन करताना दिसत नसल्याने आढळले आहे. त्यामुळे आता तीन पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आलेल्या इमारतीला पूर्ण सील करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहे.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. हा रुग्ण इमारतीमध्ये राहणारा होता. विदेशात प्रवास करून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. याच दरम्यान घरात काम करणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून कोरोना झोपडपट्टीत पोहचला. पाहता-पाहता मुंबईमधील धारावी, वरळी सारख्या झोपडपट्टीला कोरोनाने विळखा घातला. पालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणी, उपचार करत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करत झोपडपट्टीतील कोरोनाला नियंत्रणात आणले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन शिथिल होताच कोरोनाने इमारतीमधील रहिवाशांना लक्ष केले आहे.
सध्या मुंबईत झोपडपट्टीपेक्षा इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अंधेरी ते दहिसर, भांडुप, मुलुंड, ग्रँटरोड आदी विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. इमारती कॉम्प्लेक्समध्ये सोशल डिस्टनसिंग, मास्क न लावणे आदी प्रकार समोर येत आहेत. नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करून घ्या, असे आदेश सर्व विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
झोपडपट्टी आणि चाळीत एखादा रुग्ण असल्यास लपून राहणे शक्य नसल्याने रुग्ण समोर येतो. मात्र, रुग्ण इमारतीत असल्यास रुग्णाची माहिती लवकर समोर येत नाही. या दरम्यान सदर रुग्ण इतरांच्या संपर्कात आला असल्याने इतरांनाही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी एकाच इमारतीमध्ये तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर इमारतींमधील नागरिक कामानिमित्त बाहेर जात आहेत. तसेच घरामध्ये कामासाठी कामगारांना परवानगी देण्यात येत आहे. यामुळे इमारतीमधील कोरोना रुग्ण वाढत आहेत. इमारतींमधील रहिवाशांना आरोग्य विभाग आणि पालिकेने सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
इमारत, चाळी, झोपडपट्ट्या सील - 22 जुलैच्या आकडेवारीनुसार मुंबईत रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 108 इमारती आणि त्याचे काही मजले सील करण्यात आले आहेत. त्यात 2 लाख 60 हजार घरे असून सुमारे 9 लाख 60 हजार नागरिक राहत आहेत. अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, मुलुंड या विभागात सर्वाधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर रुग्ण आढळून आलेल्या 625 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभाग सील करण्यात आले आहेत. या चाळी आणि झोपडपट्टीत 9 लाख 50 हजार घरे असून 40 लाख 70 हजार नागरिक राहत आहेत. कुर्ला आणि भांडुप विभागात सर्वाधिक चाळी आणि झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत.
सील इमारत म्हणजे काय - कोरोना रुग्ण आढळून आला की, सुरुवातीला ती इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सील केली जायची. या इमारतीमधील रहिवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाण्यास मज्जाव होता. यात काही सूट देत पालिकेने रुग्ण आढळून आलेला इमारतीचा मजला किंवा विंग सील करण्याचा निर्णय घेतला होता. आता इमारतींमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने पालिकेने एकाच इमारतीत तीन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणारी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.