मुंबई - महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भाजपा सरकारच्या काळात करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच नव्याने सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. आता यामध्ये आणखी काही अधिकाऱ्यांची भर पडली आहे.
काही दिवसांपूर्वी 15 व त्यानंतर 13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर आणखी 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्याने बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून आज राहुल द्विवेदी यांची नियुक्ती राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. शंतनू गोयल यांची नियुक्ती आयुक्त, मनरेगा ,नागपूर या पदावर करण्यात आली आहे. एम.व्ही मोहिते यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम या पदावर करण्यात आली आहे. तर अजित पाटील यांची नियुक्ती सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग या पदावर करण्यात आली आहे.
दोघांच्या बदल्या रद्द
डॉ. अश्विनी जोशी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ व डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.