मुंबई - कुलाबा परिसरात शनिवारी आपल्याच मित्राच्या ३ वर्षांच्या मुलीला इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी अनिल चुगाणी (४२) या आरोपीला अटक झाली. पोलीस कोठडीत त्याने एका ३ वर्षाच्या मुलीला काळ्या जादूच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी मारले असल्याची कबुली दिल्याचे कुलाबा पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - मोलकरणीचा वृद्ध महिलेवर हल्ला; दागिने घेऊन पसार
उच्च शिक्षित असलेला आरोपी अनिल चुगणी हा मोरोक्को येथे व्यवसाय करीत होता. कुलाब्यातील अशोका इमारतीत त्याचे ७ व्या मजल्यावर घर आहे. वर्षातून केवळ २ महिन्यांसाठी तो येथे येत होता. पण अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आरोपी अनिल याने त्याच्यावर त्याच्या शत्रूंनी काळी जादू केल्याचे मोरोक्कोतील एका मांत्रिकाने सांगितले असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. पोलीस चौकशीत ही बाब समोर आली आहे.
अनिलच्या पत्नीला मुलबाळ होत नव्हते. गेली काही वर्षे त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आपण मानसिक तणावाखाली असल्याचे आरोपी सध्या पोलिसांना सांगत आहे. 'हे आपल्या शत्रूंनी केलेल्या काळ्या जादूमुळे होत आहे. या काळ्या जादूमधून बाहेर यायचे असेल तर, जुळ्या मुलींचा बळी देणे गरजेचे असल्याचे मोरोक्कोतील मांत्रिकाने सांगितले,' असे आरोपी अनिल चुगाणी याने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा - नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, नातेवाईकासह एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
ज्यावेळी ३ वर्षाच्या शनायाला त्याने बेडरूममधील खिडकीतून बाहेर फेकून दिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, त्याने काहीतरी चुकीचे केले आहे. या वेळी त्याने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले होते. मात्र, मयत शनायाच्या घरात घरकाम करणाऱ्या मोलकरणीने हा प्रकार पाहून आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यामुळे आरोपी पकडला गेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केल्यावर न्यायालयात हजर केले असता त्याची १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सुरवातीला पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतर त्यासह आता महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ नुसार कलमही जोडले आहे.