मुंबई - अभिनेता किरण माने ( Actor Kiran Mane ) यांच्यावर अद्यापही अन्याय सुरूच असल्याचा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी केला आहे. वाहिनीने पाठवलेल्या तक्रारीच्या पत्रातला फोलपणा त्यांनी उघड केला आहे. अभिनेता किरण माने याला मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र यासंदर्भात कोणताही पुरावा आरोप करणाऱ्यांनी दिला नाही. माने यांच्याविरोधात एक तरी लेखी पुरावा दाखवा, असे आव्हान आपण केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
'वाहिनी पाठवलेल्या पत्रात तारखांचा घोळ'
किरण माने हे सेटवर गैरवर्तन करत असल्याबाबत किरण माने यांना २१ जानेवारी २०२१ रोजी पत्र पाठवण्यात आले होते, असे वाहिनीने सांगितले आहे. वास्तविक हे पत्र माने यांच्याकडे पाठवताना पत्रावर पडलेली पोस्टाची तारीख ही गेल्या आठवड्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ आरोप करणारे बिनबुडाचे आरोप माने यांच्यावर करत असल्याचा दावा, जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
'शरद पवार यांची प्रकृती स्थिर'
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता करण्याचे काहीही कारण नसून त्यांची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी आपण ईश्वराकडे प्रार्थना करत आहोत, असेही आव्हाड म्हणाले.
'निवडणूक आयोगाने दखल घ्यावी'
मुंब्रा परिसरातील नव्याने तयार होणाऱ्या महापालिकेच्या प्रभाग रचनेत आपल्याला अडचणीचे ठरेल, अशी प्रभाग रचना करण्याचा डाव आखला जात असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक प्रभाग रचना करताना त्याची माहिती पालिका आयुक्तांनी बाहेर कशी येऊ दिली? हा प्रश्न आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी आणि जर काही अयोग्य होत असेल तर त्यावर कारवाई करावी, अशी आपण मागणी करत असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Kiran Mane Controversy : कलाकार आणि प्रोडक्शन हाउसमध्ये समेट घालण्याचा माझा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड