मुंबई - अँटिलीया प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राजकीय भूकंपही वाढत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर मोठे राजकीय चेहरे या प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त समोर आले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री यांनी सचिन वाझे यांना 100 कोटींच्या वसुलीचे लक्ष दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची समक्ष भेट-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी जाऊन गृहमंत्र्यांनी ही भेट घेतली असून या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची समक्ष भेट झाली. या भेटीत अनेक मुद्द्यांवर दोन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अवैधरीत्या 100 कोटी रुपये महिन्याला जमा करण्यास सांगितले, असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर नेमकं गृहमंत्र्यांची काय बाजू आहे. हे मुख्यमंत्र्यांनी या चर्चेदरम्यान जाणून घेतलं. तसेच परमबीर सिंह यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या सर्व आरोपांवर लवकरात लवकर चौकशी लावावी, अशा प्रकारची याचिका आहे. यासंबंधी काल गृहमंत्र्यांनी रात्री उशिरा पर्यंत राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृहसचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी जवळपास तीन तास चर्चा केली होती. त्या बैठकी संदर्भात देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या चर्चा झाली आहे.
परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत राज्य सरकारला आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय युक्तिवाद करण्यात येईल, अशा प्रकारची देखील चर्चा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीदरम्यान झाली.
हेही वाचा- मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेंचा सहभाग; एटीएसची महत्त्वाची माहिती