मुंबई - प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली असल्याचा आरोप करत देशभरातून जोरदार टीका करण्यात आली. मात्र जगात सगळय़ांत 'सभ्य' आणि सहिष्णू फक्त हिंदूच! हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही धर्मात, जगातील कोपऱ्यात तालिबानी प्रवृत्तीचे लोक असू नयेत, असे परखड मतही मांडले आहे.
मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हे आरोप निराधार
जावेद अख्तर म्हणाले की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा टीकाकारांनी माझ्यावर आरोप केला आहे. मात्र मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळय़ांचा परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या.
2010 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरणही जावेद अख्तर यांनी दिले आहे.
हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू
माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही. खरे तर नुकत्याच एका मुलाखतीत मी म्हटले होते की, 'हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत? याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला असल्याचेही जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.
तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत साम्य-
तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. तालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे. हिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे. तालिबानला स्त्रीयांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचे आहे. हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रीया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेले आवडत नाही, हे स्पष्ट केले असल्याचेही मत अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - जावेद अख्तर मानहाणी प्रकरण : ...तर कंगना रणौतला होणार अटक
हेही वाचा - शिवसेनेत हिंमत असेल तर, जावेद अख्तर यांना अटक करा! राम कदमांनी डिवचले
हेही वाचा - जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचा मुळ गाभा हा राष्ट्रवादी विचारांचा - संघ विचारक सुधीर पाठक