मुंबई - बांगलादेशप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहेत. त्यामुळे मालवणी भागातसुद्धा भीतीचे वातावरण आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देऊन हिंदूंना हिम्मत देणार आहोत, असे आमदार नितेश राणे म्हणाले. पुढील वर्षी मुंबईत होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता राजकारण तापू लागले आहे.
हिंदुत्वाचं राजकारण? -
गुरु मां कांचन गिरी व जगद्गुरु सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर केलं आहे. हा धागा पकडून आता भाजपसुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सक्रिय झालेली आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेनेने सत्ता स्थापन करताना काँग्रेस व राष्ट्रवादीची साथ धरल्याने आता शिवसेनेचे हिंदुत्व मागे पडत आहे की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना राज ठाकरे व त्यासोबत भाजप या मुद्द्यावर आता प्रखरपणे पुढे येताना दिसत आहे.
बांगलादेशचे पडसाद मुंबईत -
बांगलादेशात रंगपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिराचा विध्वंस करण्यात आला होता. या घटनांविरुद्ध अल्पसंख्यांक हिंदूची निदर्शने सुरू होती. त्याचवेळी समाज माध्यमांवरील एका कथित ईश्वरनिंदात्मक पोस्टच्या मुद्द्यावर जमावाने हिंदूंवर अत्याचार करायला सुरुवात केली आहे. त्याच पद्धतीने मुंबईतसुद्धा हिंदू सुरक्षित नसून मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
बांगलादेशप्रमाणे मुंबईत मालवणी भागातसुद्धा भीतीचे वातावरण आहे. मुंबईतील अनेक भागातही अशीच परिस्थिती आहे. आम्ही अशा ठिकाणांना भेटी देऊन हिंदूंना हिम्मत देणार आहोत. मुख्यमंत्री बंगाल पॅटर्न मुंबईमध्ये कसे राबवत आहेत? त्याचा पर्दाफाश येणाऱ्या दिवसात आम्ही करणार आहोत.
हेही वाचा - नवं हिंदू म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोणाला डिवचले? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार!