मुंबई - उकाड्यापासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी तसेच स्थानकात सर्वत्र हवा खेळती रहावी याकरिता मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि पश्चिम रेल्वेचे चर्चगेट, मुंबई सेंट्रल या चार स्थानकात उच्च क्षमतेचे पण मंदगतीने फिरणारे हाय व्हॉल्यूम लो स्पीड ३९ फॅन बसविले आहेत. दूरवर हवा फेकण्याची क्षमता असलेल्या या पंख्यांमुळे लांबवर उभ्या असलेल्या प्रवाशांनाही गारेगार हवा मिळणार आहे.
'या' स्थानकांत बसविले पंखे
प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. इतकेच नव्हेतर विजेची बचत करण्यासाठी पंखे आणि एलईडी लाईट्स रेल्वे स्थानक आणि रेल्वे कार्यालयात लावण्यात येत आहेत. स्थानकात सर्वत्र हवा खेळती राहावी, याकरिता मध्य रेल्वेचे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या दोन स्थानकांत उच्च क्षमतेचे पण मंदगतीने फिरणारे (हाय व्हॉल्यूम लो स्पीड) २६ पंखे बसविले आहेत. ज्यामध्ये सीएसएमटी स्थानक २० तर ठाणे रेल्वे स्थानकांत ६ पंख्यांच्या समावेश आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर १३ हाय व्हॉल्यूम लो स्पीड पंखे लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये चर्चगेट स्थानकात ५ पंखे तर मुंबई सेंट्रल स्थानकात ८ पंखे बसविण्यात आले आहे.
वीजेची बचत
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, की ३४ पंखे आतापर्यंत पश्चिम रेल्वेमार्गावरील विविध स्थानकांत लागले आहेत. यात चर्चगेट पाच, मुंबई सेंट्रल दहा, बांद्रा टर्मिनस दोन, अंधेरी पाच, जोगेश्वरी चार, गोरेगाव तीन आणि बोरीवली स्थानकात पाच पंखे लागले आहेत. पश्चिम रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात अतिरिक्त २० पंखे लावण्याचे नियोजन केले आहे. या पंख्यांची मोटर क्षमता जास्त असते. तसेच या पंख्यामुळे विजेचीदेखील बचत होते. मध्य रेल्वेच्य सीएसएमटी, भायखळासह सहा महत्त्वाच्या स्थानकांत हे पंखे लागले आहेत.