मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Mns Leader Raj Thackeray ) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली ( File Charges Treason Against Raj Thackeray ) आहे.
राज ठाकरे यांनी पुणे, ठाणे आणि औरंगाबाद येथे सभा घेत राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी काँगसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका-टिप्पणी करीत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असे चिथावणीखोर वक्तव्य करीत हनुमान चालीसा म्हणण्याचे आदेश ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करावी, अशी हेमंत पाटील मागणी पाटील यांनी केली आहे.
राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवू पाहणाऱ्या, प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदा, राजकीय दौरे, विविध शहरांतील भेटीच्या कार्यक्रमांवर तुर्तास बंदी घालावी, अशी मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर ज्याप्रमाणे देशद्रोहाची कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई ठाकरेंवर करावी, अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.