मुंबई - मुंबई शहर व उपनगरे तसेच ठाणे परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ठाणे-दिवा दरम्यानची धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. कळवा येथे पाणी भरल्याने मध्य रेल्वेने लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे मेल, एक्स्प्रेस सेवा विस्कळीत -
करमळी आणि थिवी रेल्वे स्थानकादरम्यान जोरदार पाऊस पडल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे रूळावर चिखल जमा झाल्याने अनेक मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. 19 जुलै रोजीची गाडी क्रमांक 01112 मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या विशेष गाडी आणि 20 जुलै रोजीची गाडी क्रमांक 01113 सीएसएमटी-मडगाव मांडवी विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
रेल्वे गाड्या आंशिक रद्द -
19 जुलै रोजी गाडी क्रमांक 01134 मंगळुरू - सीएसएमटी दैनंदिन विशेष गाडी मंगळुरू - मडगाव रद्द करण्यात आली आहे. ही गाडी थिविहून रात्री 11 वाजता सीएसएमटीसाठी सुटली.